
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील ३० वर्षीय युवकाने पिळोदा शिवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २३ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.
सतीश युवराज कोळी (वय ३० रा अमळगाव) याने पिळोदा शिवारातील प्रेमराज वामन चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत उडी मारली. निखिल चंद्रशेखर महाले याने ही घटना सतीशचा भाऊ समाधान याला सांगितल्यावर सर्व घटनास्थळी गेले असता सतीशचे प्रेत तरंगताना दिसले. त्याचे शव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.




