
निवडणूक निरीक्षक (खर्च) रोहित इंदोरा यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात भेटीच्या वेळी सूचना…
अमळनेर:- व्हिडीओ पथकाने सभेच्या ठिकाणी वेळेपूर्वी एक तास आधी हजर रहावे आणि सभा पूर्ण संपल्या नंतर तेथून निघावे. सभेच्या ठिकाणावरील खुर्च्या सह बारकाईने चौफेर चित्रीकरण करावे अशा सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) रोहित इंदोरा यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघात भेटीच्या वेळी दिल्या.
निवडणूक निरीक्षक रोहित इंदोरा यांनी २३ रोजी अमळनेर येथे भेट दिली मीडिया सेल, कंट्रोल रूम, खर्च विभाग, एफ एस टी, एस एस टी, एक खिडकी योजना, चेक नाका आदींची पाहणी केली. सर्व विभागाला पुरेशी जागा , पुरेसे साहित्य आहे की नाही याची पाहणी केली. त्यांच्या सोबत सहाय्यक एन कृष्णमूर्ती , उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , गटविकास अधिकारी डॉ ओम रामावत , पोलीस निरीक्षक विकास देवरे , मुख्याधिकारी तुषार नेरकर हजर होते.
तीन ठिकाणी नाका तपासणी…
दरम्यान तालुक्यातील चोपडाई, बामणे, मांडळ या तीन ठिकाणी एस एस टी पथक नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी दोन पोलीस ,एक व्हिडिओग्राफर आणि एक अधिकारी असे चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. १२ तासानंतर दुसरे पथक कर्तव्यावर असेल त्यामुळे तालुक्याच्या सीमेवर २४ तास नजर असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी दिली. २६ रोजी सुमारे १७०० कर्मचार्यांना दोन टप्प्यात ग्लोबल स्कूल मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आतापर्यंत १४ परवानग्या
आतापर्यंत सुमारे १४ परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यात मंत्री अनिल पाटील यांची मिरवणूक , सहा वाहन परवाने , ध्वनिक्षेपक २ , प्रचार रॅली १ , सभा दोन आणि हेलिकॉप्टर एक अशा १४ परवानग्या देण्यात आल्या आहेत.




