
पाच जणांना अटक, आणखी दोन संशयित ताब्यात, एक फरार
अमळनेर : जळोद अमळगाव रस्त्यावर झालेल्या खून प्रकरणी सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात दोन भावांचा समावेश आहे. ते दोघेही पाचोरा येथे नोकरीस असल्याचे समजते.पोलिसांनी पाचही जणांना अटक करून आणखी दोन संशयित ताब्यात घेतले आहेत.
मयत विकास पाटील यांचा भाऊ विठ्ठल प्रवीण पाटील याने फिर्याद दिली की, तो २ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याच्या मोटरसायकलने पिंगळवाडे ता अमळनेर येथे यात्रेसाठी जात होता. गांधली गावाच्या स्मशानभूमीजवळ त्याला गर्दी दिसली. त्याने थांबून विचारपूस केली असता त्याचाच भाऊ व भावाचा मित्र अजित यांचे स्विफ्ट कार एम एच 19 बीजे 4791 मधील लोकांशी वाद सुरू होता. कार ने विकास याच्या मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलचे इंडिकेटर तुटले होते आणि तरी देखील कार मधील सहा जण वाद घालत होते. त्यांची समजूत घालून त्यांना पुढे रवाना केले. गाडीतील लोकांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे अमोल वासुदेव कोळी , मनोज हनुमंत श्रीगणेश , कमलाकर हनुमंत श्रीगणेश , नितीन दिनकर पवार , हर्षल नाना गुरव , रोहित सीताराम पाटील रा गांधली व पिळोदा असे समजले. विकास पुढे अमळगाव येथे घाबरलेल्या अवस्थेत उभा असताना ती स्विफ्ट कार आणि काही मोटरसायकल मागाहून लाकडी दांडके व लोखंडी रॉड घेऊन आले. आणि विकासला धक्काबुक्की करू लागले म्हणून विठ्ठल ने त्याला जळोद रस्त्यावर पळवले. मात्र अवघ्या ४०० ते ५०० फूट अंतरावरच कार ने धडक देऊन त्याची मोटरसायकल पाडली आणि सर्वांनी त्याला लाकडी दांडक्याने ,लोखंडी रॉड ने डोक्यावर , चेहऱ्यावर जबर मारहाण केली आणि पळून गेले. विकासला तातडीने डॉ अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणले. उपचार केल्यावर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केले.
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील , पीएसआय बोरकर , पीएसआय विनोद पाटील , हेडकॉन्स्टेबल भरत ईशी, संजय पाटील , प्रवीण पाटील ,संजय पाटील ,सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली. तातडीने वरिष्ठांना माहिती कळवली. काही आरोपी जामनेर कडे पळाल्याचे एलसीबी पथकाला समजले. एलसीबी ने सकाळी आठ वाजता अमोल वासुदेव कोळी , नितीन दिनकर पवार , हर्षल नाना गुरव याना जामनेर परिसरातून अटक केली. तर आरोपी मनोज श्रीगणेश व कमलाकर श्रीगणेश या दोघांना पाचोरा येथून अटक केली आहे. त्याचप्रमाणे एलसीबी पथकाने या प्रकरणात आणखी संशयित दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सातही जणांना मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रोहित सीताराम पाटील अद्याप फरार आहे.




