
अमळनेर:- विधानसभा निवडणुकीत ३२५ मतदान केंद्र असून ६६ टक्के म्हणजे २५० मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. तर ७५ मतदान केंद्रांवर मायक्रो ऑबझर्व्हर नियंत्रण ठेवतील. गेल्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी स्वीप अंतर्गत जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुमारे १७०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून दूसरे प्रशिक्षण ११ रोजी मतदार संघ बदलवून होणार आहे. निवडणूक कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी मतदान पत्रिका देण्यात येणार असून त्याच ठिकाणी मतदान केंद्र ठेवण्यात येणार आहे. आणि जर चुकून यावेळी कर्मचाऱ्यांचे मतदान राहिले तर निवडणूक साहित्य घेताना मतदान करावे लागणार आहे. तसेच बंदोबस्ताला असलेल्या पोलीस व इतर कर्मचाऱ्यांना उपविभागीय कार्यालयात पोस्टल वोटिंग सुविधा ठेवण्यात आली आहे.
अमळनेर विधानसभा मतदार संघात ८५ पेक्षा अधिक वयाचे १४९ मतदार आणि ४१ मतदार दिव्यांग आहेत. अशा व्यक्तींना स्वतःच्याच घरी मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी १० पथक नियुक्त केले आहेत. या मतदारांसाठी ८ व ९ रोजी पहिला टप्पा घेतला जाईल. आणि जर कोणाचे मतदान राहिले तर नंतर १४ व १५ रोजी दुसरा टप्पा घेतला जाईल. जर दुसऱ्या टप्प्यातही मतदान केले नाही तर मात्र या मतदारांना मतदानाची संधी राहणार नाही असेही नितीन मुंडावरे यांनी सांगितले.
ज्या केंद्रांवर आधी कमी मतदान झाले आहे त्याठिकाणी स्वीप अंतर्गत जनजागृती , संकल्प पत्र भरून घेणे ,प्रबोधन करणे असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.




