अमळनेर : ट्रॅक्टरची माहिती तलाठी व पोलिसांना देतो म्हणून कळमसऱ्याच्या तिघांनी तांदळी येथील एकाला चाकूने व इतर दोघांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २२ रोजी रात्री साडे दहा वाजता पडावद फाट्यावर सार्वजनिक जागी घडली.
निलेश प्रतापसिंग परदेशी वय ४० रा तांदळी हा २२ ऑक्टोबर रोजी बेटावद येथे खाजगी कामाला गेला होता.मोटरसायकलने परत येत असताना पडावद फाट्याजवळ चेतन विजयसिंग राजपूत, नईम पठाण ,साहिल पठाण तिघे रा कळमसरे यांनी तिघांनी त्याला अडवून तू आमचे ट्रॅक्टरबाबत तलाठी व पोलिसांना माहिती देतो. तुला आता संपवूनच टाकतो म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी निलेश ने शहापूर आणि जैतपिर येथील त्याचा पुतण्या आणि मित्रांना बोलावले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरी तिघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते वादावादी वाढून चेतन राजपूत याने मांडीला चाकू मारला. निलेशच्या मांडीतून रक्त येऊ लागले. त्याचवेळी त्यांनी निलेशच्या पुतण्या कुणाल उदयसिंग परदेशी आणि मित्र भूषण विक्रमसिंग परदेशी यांनाही चापट बुक्क्यांनी मारहाण केली. बाकीच्या लोकांनी सोडवासोडव करून निलेश ला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठवले.उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सचिन निकम करीत आहेत.