अमळनेर:- माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केल्याचा दावा फोल ठरले असून आधीच्या आमदारांच्या कार्यकाळातील कामे ही त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली नव्हती हीच वस्तुस्थिती आहे. जे मी बोलतो ते करून दाखवतो असे सांगणाऱ्या शिरीष चौधरीचे अनेक आश्वासने हवेतच विरली आहेत.
बोहरा उपसा सिंचन योजना
२०१९ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील बोहरा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती साठी ११.४९ कोटी मंजुरीस मान्यता मिळाल्याने मोठा गाजावाजा करत त्यांचे श्रेय घेतले होते. मात्र त्या योजनेचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन
शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात अमळनेर ग्रामीण रुग्णालय पन्नास खाटांचे होऊन उपजिल्हा रुग्णालय असे श्रेणीवर्धन झाल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबतीत काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे त्यांचा हा दावा ही फोल ठरला आहे.
आदिवासी मुलांसाठीचे क्रीडा संकुल…
तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुल उभारू असे आश्वासन शिरीष चौधरी यांनी आदिवासी दिनानिमित्त समाजबांधवांना दिले होते. वास्तविक या स्वतंत्र क्रीडा संकुल दूर, ज्या तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू होते, ते काम निधी न मिळवता आल्याने पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ उलटून गेला तरी पूर्ण करता आले नाही.
नदीजोड प्रकल्प हवेतच विरला..
तालुक्यातील तापी, पांझरा, चिखली, बोरी व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार असे स्वप्न शिरीष चौधरी यांनी तालुक्यातील जनतेला दाखवले होते. मात्र त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्याबाबत त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.
शहरातील भूमिगत विद्युत केबल
शहरात भूमिगत केबल होणार असल्याचे आश्वासन नगरपालिका निवडणुकीवेळी शिरीष चौधरी यांनी जनतेला दिले होते. मात्र त्यानंतर त्यावर कोणतीही हालचाल झाली नाही.
लोटा बाळगी पाझर तलाव
तालुक्यातील रणाइचे परिसरातील महत्त्वाचा विषय असलेल्या लोटा बाळगी पाझर तलावाचे काम पूर्ण करू असे आश्वासन शिरीष चौधरी यांनी रणाइचे ग्रामस्थांना दिले होते. मात्र त्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे.
सेवाभावी संस्थांच्या कामाचे श्रेय लाटले
तालुक्यातील मारवड येथील सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सिंचन विषयक कामे करण्यात आली, मात्र शिरीष चौधरी यांनी त्या कामांचे ड्रोन व्हिडिओ काढून त्या कामाचे श्रेय लाटले असा आरोप तत्कालीन सरपंच दिलीप पाटील यांनी मागील निवडणुकीवेळी केला होता. जलयुक्त शिवारची कामे संपूर्ण राज्यात सुरू असताना त्या कामाबाबतही श्रेय घेण्याचे प्रकार झाले होते.
क्रमशः….