
अमळनेर:- विकासाचे व्हिजन नसल्याने अमळनेर मतदारसंघातील माजी आमदार शिरीष चौधरी हे दुसऱ्याच्या कामांचे श्रेय घेत भूलथापा मारत वेळ काढू नेतात. तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देणार असे सांगणाऱ्या शिरीष चौधरी यांनी दिलेल्या शब्दाकडे अनेकदा पाठ फिरवली आहे.
अमळनेर नगरपरिषद इमारत…

अमळनेर नगरपरिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या काळात झाले होते. त्यासाठी लागणारा पाठपुरावा त्यांच्याच कार्यकाळात झाला होता, फक्त काम शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात झाल्याने त्यांनी आपण नवीन अद्ययावत प्रशस्त इमारत बांधण्याचा दावा केला होता.
नवीन पोलिस वसाहत…

शहरातील नवीन पोलिस वसाहतीसाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पाठपुरावा करत निधी मंजूर करून आणला होता. मात्र चौधरी यांनी या ही कामावर दावा ठोकत श्रेय घेतले होते.
चोपडा रस्त्यावरील उड्डाणपूल…

माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मारवड रस्त्यावरील व चोपडा रस्त्यावरील उड्डाणपूल यासाठी मंजुरी घेत निधी मंजूर करून आणला होता. मात्र आपणच हे काम केले असा गाजावाजा शिरीष चौधरी यांनी केला होते.
माजी आमदारांनी भाजीपाला मार्केटचे नूतनीकरण करू असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही तेथे जैसे थे परिस्थिती आहे. त्यांच्या उद्योग समुहामार्फत आठ ते दहा हजार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प शिरीष चौधरी यांनी केला होता. मात्र आठ दहा तरुणांसाठी ही रोजगार निर्मिती झालेली नाही. गेली चार वर्ष माजी आमदार तालुक्यात न फिरकल्याने त्यांच्या खाजगी पी. ए.ने दुसरीकडची वाट पकडल्याची वस्तुस्थिती आहे.
विकासाचे व्हिजन नसल्याने व निधी खेचून आणण्याची धमक नसल्याने माजी आमदार हा दुसऱ्याच्या कामावर रेघोट्या करण्याचे काम करीत असतात. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी इतर मुद्द्यांवर चर्चा केली जात असते. त्यामुळे पुन्हा ते निवडून आल्यास तालुका परत पंधरा वर्ष मागे जाईल, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
उद्या वाचा,
पाडळसरेसाठी कोणी किती पाडली बोंब…




