
महायुतीला निवडून आणण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन
अमळनेर : विधानसभा निवडणुकीत तुम्हाला ७१ हजार पेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेव्हढा जास्त लीड तेवढे मजबुत खाते अनिल पाटलाना मिळेल. त्यामुळे २० तारखेला घड्याळ चिन्हाचे जास्तीत जास्त बटन दाबून महायुतीला निवडून आणा असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथील महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
११ रोजी सायंकाळी बन्सीलाल पॅलेस मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. ना महाजन यांनी शिरीष चौधरी यांचे नाव न घेता आमचे डमी उमेदवार म्हणून अफवा पसरवली जात आहे. मात्र आम्ही त्याची हकालपट्टी केली आहे. आमचा उमेदवार अनिलदादा आहे. लोकसभेला एकत्र असल्याने ७१ हजाराचा लीड मिळाला आता उपकाराची परत फेड करायची वेळ भाजपची आहे. आम्ही तुमच्याकडे मतदार म्हणून नव्हे तर परिवार म्हणून पाहतो. विकास कामे हीच आपली जात समजायची.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की अमळनेरची जनता विकासाच्या मागे उभी राहणारी आहे. उदय बापू गेल्यानन्तर ताई संपली असे म्हणणाऱ्यांना गिरिषभाऊ यांनी चपराक दिली. भाऊंनी मला खासदार बनवले. मी आणि अनिलदादा पाडळसरे धरण पूर्ण करणार आहे आपण प्रत्येकाने आपल्या गावात जास्तीत जास्त मतदान काढावे.
मंत्री अनिल पाटील म्हणाले की अमळनेरच्या कार्यकर्त्याला कामासाठी कोणाच्या वशिल्याची गरज नाही. आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. मागच्या काळात गुंडगिरी वाढली होती ,तरुण दारूच्या आधीन झाले होते. ही संस्कृती मोडून काढायची आहे. भाषण चालू असताना अचानक अनिल पाटील यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत अमळनेर येथील राजमाता जिजाऊ सुतगिरणीला मिळालेला पैसा कोल्हापूर कडे कसा वळवला गेला. घोटाळा झाल्याचे दाखवून भावनिक आवाहन व्हिडीओ द्वारे करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल पाटील यांनी ना महाजन यांच्याकडे केली. गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध मंदिरांसाठी ५०० कोटींचा निधी दिल्याचेही अनिल पाटील यांनी सांगून निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी सांगितले की भाजप ,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष म्हणजे घड्याळाचे तीन काटे आहेत. ते एकत्र आले म्हणजे बारा वाजतात. येत्या २० तारखेला एकत्र येत घड्याळाचे बटन दाबा म्हणजे विरोधकांचे बारा वाजतील.
यावेळी सेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपाई चे यशवंत बैसाणे, देविदास देसले ,गौरव महाजन, रामकृष्ण पाटील, अरुण पाटील, दिनेश शेलकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले. अनिल पाटील यांच्या मदतीला भाजप सरसावली असल्याने मेळाव्यास प्रचंड गर्दी होती.




