बेकायदेशीर हॉटेल, बार आणि धाबे करतायेत तालुक्यातील तरुण पिढी बरबाद…
अमळनेर:- आगामी विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली असून अमळनेर शहरात व परिसरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आले आहे. मात्र तालुक्यात सर्वत्र खानावळ व हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खुलेआम दारूविक्री अविरत सुरू आहे.
शहरातील धुळे रोड, चोपडा रोड, हेडावे रोड ,तसेच गलवाडे रोडवरील असोदा मटन हॉटेल, साई पॅलेस, हॉटेल फाल्गुनी, हॉटेल श्रावणी, बाबाजी का ढाबा, हॉटेल निर्मल अशा अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आल्या.
शहरातील गलवाडे रस्ता आणि धुळे रस्त्यावर बेकायदेशीर हॉटेल, धाबे आणि बार सुरू असून यात खुलेआमपणे मद्य विक्री सुरू आहे. अन्न व औषध विभागाची कोणतीही परवानगी नसताना ही खानावळ सुरू आहेत, त्यामुळे ही बेकायदेशीर हॉटेल, बार आणि धाबे अमळनेर शहर आणि तालुक्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त करीत आहेत, कोणाच्या आशीर्वादाने हे बेकायदेशीर धंदे सुरु आहेत हे अमळनेरकर जनतेला समजले पाहिजे ? पोलीस आणि पालिकेची अधिकारी या बेकायदेशीर हॉटेल्स आणि बार वर कारवाईचा बडगा का उगारत नाही ? पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांची यास अर्थपूर्ण संमती आहे का ?असा सवाल जनता विचारु लागली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुणे ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. मात्र अमळनेर शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना ही हॉटेल्स आणि बार दिसत कसे नाहीत, शहरातील दुकाने रात्री 10 वाजता बंद करायला लावणारे पोलीस प्रशासन या हॉटेल्सकडे 10 वाजेनंतरही डोळेझाक करतात. शहरातील या हॉटेल कम बार असलेल्या खानावळीमध्ये अनधिकृतपणे मद्य विक्री केली जाते, तेथेच बसून तळीराम मांसासोबत मद्य रिचवतात, या हॉटेल्सच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. शहरातील अनेक अल्पवयीन मुले अशा बेकायदेशीर हॉटेल्स मध्ये मद्यसेवन करताना दिसून येतात, अशा अल्पवयीन मद्यधुंद तरुणाचे अपघात ही या रस्त्यावर झाले आहेत तर याच मद्यधुंद तरुणाईने अनेक निरपराध पायी फिरणाऱ्या पादचाऱ्यांवर मोटारसायकल घालून जखमी केले आहे, ही बेकायदेशीर हॉटेल्स बंद झाली तर अमळनेर शहरातील शांतता नांदेल,तेंव्हा पोलीस आणि नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर हॉटेल्स, बार आणि खानावळी वर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.