अमळनेर:- तालुक्यातील वासरे येथे गैरसमजुतीतून तिघांनी एका दाम्पत्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना १७ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला व तिचे पती यांचे किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. त्यावेळी घराबाहेरून जाणाऱ्या शंकर रघुनाथ पाटील यांना वाटले की, फिर्यादीचे पती हे त्यानांच बोलत आहेत. त्यामुळे शंकर पाटील यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावेळी फिर्यादी समजूत काढण्यासाठी गेली असता त्यांचा मोठा मुलगा अमोल शंकर पाटील हा लाकडी दांडका घेऊन आला. व पती पत्नीला मारहाण केली, त्यात फिर्यादी महिलेची साडी फाटली. थोड्या वेळाने त्यांचा धाकटा मुलगा सागर शंकर पाटील हा आला. तुमच्यामुळे आमच्या घरात भांडण सुरू झाले आहे असे म्हणत त्याने फिर्यादीच्या पतीला चापट बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जर तुम्ही काही बोलले तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी त्यांनी दिली. सदर महिलेच्या पतीला उपचारासाठी धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.