अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या २० रोजी होणाऱ्या मतदानाची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून १९ रोजी टाकरखेडा रस्त्यावरील वखार महामंडळाच्या गोदामात १८१३ कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अकरा विशेष मतदान केंद्रे
एकूण तीन महिला मतदान केंद्रे असून तेथे सर्व महिला कर्मचारी नियुक्त असतील. १ युवा मतदान केंद्र असेल तेथे सर्व अधिकारीही युवक असतील २ दिव्यांग मतदान केंद्र तर पाच आदर्श मतदान केंद्र असतील
विधानसभा निवडणुक कामातील कर्मचाऱ्यांना चक्रीका ऍप देण्यात आले असून त्या माध्यमातून त्यांच्या हालचाली कळणार आहेत. तसेच ३६८ अंध मतदारांसाठी पूर्वतयारी म्हणून ब्रेल लिपीतील मतपत्रिका हाताळण्यास देण्यात येणार आहे. नंतर ईव्हीएम वरील नंबर हाताळून त्यांना मतदान करता येणार आहे. २५० मतदान केंद्रावर वेब कॅमेरे तर ७५ केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नजर असणार आहे त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या मतदाराला केंद्राध्यक्ष मतदान करण्यापासून रोखू शकतात असेही मुंडावरे यांनी सांगितले. धाबे येथील केंद्र क्रिटिकल म्हणून जाहीर करण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ९० टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. त्यामुळे हे केंद्र क्रिटिकल जाहीर केले आहे. आतापर्यंत १०९९ पोस्टल बॅलेट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ७२० मतदान झाले. ८५ वर्षावरील व दिव्यांगांचे १८२ मतदान झाले. ४ मयत तर ४ जण बाहेरगावी गेलेले होते. सैनिकांचे इटीपिबीएस ९८४ पैकी ९२८ मतपत्रिका डाउनलोड झाल्या आहेत. पैकी ९२ प्राप्त झाले आहेत. मतदान साहित्य वाहतुकीसाठी ६० मार्ग आहेत. ४० बसेस , २९ क्रूझर , २४ जीप अशा वाहनांची सोय करण्यात आली आहे.
मतदार संघात २३४९ दिव्यांग मतदार असून त्यांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी एनसीसी व एनएसएस विद्यार्थी केंद्रनिहाय नियुक्त केले आहेत. ११८ ग्रामपंचायतीनी प्रत्येकी एक तर पालिकेने ३४ व्हीलचेअर घेतल्या आहेत. स्तनदा माता व लहान बालके याना सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेविका , आशाताई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर मेडिकल किट , व पडवी नसलेल्या मतदान केंद्रावर मंडप टाकण्यात आला आहे. स्वच्छतागृह ,मुतारी तसेच वीज गेल्यावर अडचण येऊ नये म्हणून विप्रो कंपनीने ३५० चार्जिंग लाईट दिले आहेत.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात १५७०५ पुरुष, १५०४६४ स्त्रिया, ३ तृतीयपंथी असे एकूण ३,०८,२७२ मतदार असून ९ मतदार परदेशस्थ आहेत. दरम्यान १८ रोजी सायंकाळी ६ वाजेला प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सर्वत्र लावलेले प्रचार साहित्य उतरवण्यात आले आहे. आणि मतदारसंघाबाहेरील नागरिकांना मतदार संघ सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.