अमळनेर:- तालुक्यातील पिंगळवाडे येथील आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंगळवाडे येथील आश्रमशाळेत सायंकाळची हजेरी घेताना पहिलीचा विद्यार्थी पंकज जमादार वळवी ( वय ७ वर्ष) रा.केलीपाणी ता. तळोदा जि. नंदुरबार हा दिसत नसल्याचे लक्षात आल्याने सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी सदर मुलगा शाळेच्या बाजूला असलेल्या अतुल शरद पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे लक्षात आले. मात्र त्याचे प्रेत वर तरंगत असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याने पोलिसांना कळवून गावकऱ्यांनी खाटेला दोर बांधून विहिरीत सोडून सदर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला, रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भरत कोळी याच्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय राहुल बोरकर हे करीत आहेत.
शाळेत शौचालय असताना विद्यार्थी बाहेर जातात शौचाला ?
सदर आश्रमशाळेतील बरेच विद्यार्थी आजूबाजूच्या शेतात शौचाला जात असल्याचे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले. शाळेत शौचालय असताना ही विद्यार्थी बाहेर शौचाला जातात त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिक्षकाचे विद्यार्थ्यावर नियंत्रण नसल्याचे ह्या घटनेने निदर्शनास आले असून त्यांच्या दुर्लक्षाने एका कोवळ्या पोराचा जीव गेला आहे. याबाबत संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.