पाच तालुक्यात एड्सचे ४० नवीन उपचार घेणारे वाढले
अमळनेर : जळगाव जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयानंतर फक्त अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात एच आय व्ही पॉझिटिव्ह रुग्णांवर ए आर टी उपचार केले जात आहेत. पाच तालुक्यातील रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. नवीन ४० रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

१ डिसेंबर ते १५ डिसेंबर अंतर्गत विविध एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम ,एचआयव्ही तपासणी, एच आय व्ही एड्स जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध शासकीय खाजगी महाविद्यालय बाजारपेठ बस स्थानक रेल्वे स्टेशन टॅक्सी स्टँड रेड लाईट एरिया अति जोखमीचे विभाग अशा विविध ठिकाणी कार्यक्रमांचे विशेष अवलंबन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत ग्रामीण रुग्णालय अमळनेर या ठिकाणी एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केंद्र (ICTC) स्थापना करण्यात आली आहे यात नागरिकांना मोफत समुपदेशन व तपासणी करण्यात येते, तसेच तपासणी अंतर्गत एचआयव्ही बाधित आढळल्यास पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथील एआरटी उपचार केंद्र या ठिकाणी एचआयव्ही संदर्भात उपचार मोफत पणे सुरू करण्यात येते. आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे समुपदेशक अश्वमेघ पाटील हे रुगांना समुपदेशन करतात. मार्च 2024 ते नोव्हेंबर 2024 अंतर्गत आयसीटीसी येथे 1580 पुरुष अथवा युवक 1593 महिला अथवा युवती अशा एकूण 3387 जणांची तपासणी करण्यात आली. यात ०३ पुरुष/युवक व ०७ महिला/ युवती अशा एकूण दहा व्यक्ती एचआयव्ही सहजीवन जगत आहे असे आढळून आले. 760 गर्भवती महिला यांचे देखील एचआयव्ही तपासणी करण्यात आली.
तसेच तालुका स्तरावर जानवे, मांडळ, ढेकू, पातोंडा, मारवाड उपकेंद्र व अमळगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देखील एचआयव्ही तपासणी ही मोफत स्वरूपात करण्यात येते.
ए आर टी उपचार केंद्र ग्रामीण रुग्णालय अमळनेर
या ठिकाणी अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल, धरणगाव येथील एच आय व्ही सहजीवन जगणाऱ्या रुग्णांना एआरटी उपचार हा मोफत स्वरूपात देण्यात येतो. डॉ. प्रशांत शिंदे (ART वैद्यकीय अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. समुपदेशक जयेश मोरे हे रुग्णांना एआरटी संदर्भात समुपदेशन करतात.811 पुरुष , 892 महिला, 36 बालक/युवक , 29 बालिका /युवती, 1 तृतीयपंथी असे एकूण १७६९ रुग्णाना एआरटी उपचार नियमित सुरू आहेत. नवीन वर्ष अंतर्गत एकूण 40 नवीन रुग्णांना ए आर टी उपचार सुरू करण्यात आला आहे तर वर्षभरात तीन रुग्ण दगावले आहेत.




