अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी उघड झाली होती. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी ६ तासातच संबंधित घटना उघड करून यशस्वी तपास लावला आहे. हि घटना अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता म्हणून पत्नीच्या प्रियकराने पतीचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेला संशयित आरोपी प्रियकरासह मयताच्या पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
तुषार चिंधू चौधरी (वय ३७ रा.मारवड ता.अमळनेर ह.मु. प्रताप मिल, अमळनेर) असे मयत तरुण पतीचे नाव आहे. अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरूण पत्नी पुजा, २ मुलांसह वास्तव्याला होता. गुरूवारी दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार हा त्याचा ओळखीचा असलेला सागर चौधरी यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला, यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दोनवेळा दगड टाकून त्याचा निघृण खून करून पसार झाला होता.
दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हा घरी पोहोचलेला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यात तुषार चौधरी याच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला दोंडाईचाजवळच्या मालपूर येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची त्याने कबुली दिली. त्यामुळे पोलीसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मयत तरुणाचे चुलतभाऊ मधुकर धुडकु चौधरी (वय ५५, रा. मारवड) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चौधरी (वय – ३५ रा. दोंडाईचा जि. धुळे) आणित पुजा तुषार चौधरी (रा. प्रताप मिल, अमळनेर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
त्या दोघांचे आधीपासून होते संबंध…
तुषार चिंधु चौधरी याचा खून दोंडाईचा मालपूर येथील सागर बापू चौधरी याने केल्याचे निष्पन्न झाले असून तुषारची पत्नी पूजा आणि सागर यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सागर बापू चौधरी आणि पूजा चौधरी यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. आणि सागर अनेकदा अमळनेर येथे येऊन तो पुजाला घेऊन बाहेर जात होता. सागर याला एक मुलगी असून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याने त्याने पूजाशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. पूजाने देखील त्याच्या सोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. सागरने तुषारचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. पूजा तुषारला मारू नको असे सांगत होती. मात्र अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय सागरने घेतला होता. पूजाने सागरला बोलावून घेतले होते. पती तुषार याला सांगितले की, माझा नातेवाईक येत आहे तुम्ही त्याच्या सोबत पत्रिका वाटायला जा. सागर आल्यावर त्याने तुषारला सोबत घेतले आणि दारू प्यायला घेऊन गेला आणि मंगरूळ येथे जाऊन त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
पोलिसांनी मोबाईल , सीसीटीव्ही कॅमेरे आदी बाबी तपासल्या. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी कैलास शिंदे , मिलिंद सोनार , अमोल पाटील, शेखर साळुंखे , निलेश मोरे, विनोद सदाशीशीव ,उज्वल म्हस्के, नितीन कापडणे, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, पूनम हटकर यांच्या पथकाला दोंडाईचा येथे पाठवले. सागर याने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्याचे मोबाईलचे दुकान होते. खुनानंतर काही तासात ६ रोजीच दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केल्यावर प्रेम कहाणी उघडकीस आली. त्यांनतर तुषार याची अंत्ययात्रा झाल्यानंतर पूजाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.