लवकरच पुरवणी मागणीला मंजुरी आणि निधीही मिळणार…
अमळनेर:- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे साठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली तर बोदवड उपसा सिंचन योजना प्रधानमंत्री सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी अनिल पाटलांना मंत्रीपदातून डावलले मात्र दुसऱ्याच दिवशी अमळनेरच्या पारड्यात भर टाकली आहे. लवकरच मंजुरी मिळेल आणि काही प्रमाणात निधी देखील प्राप्त होईल. नियमित अर्थसंकल्पात आतापर्यंत १०० ते १३५ कोटींची तरतूद निम्न तापी प्रकल्प पाडळसरे साठी होत होती. परंतु पहिल्यांदा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसताना पुरवणी मागणीत २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या अर्थसंकल्पात मंजूर झालेले १०० कोटी देखील प्राप्त झाले आहेत.
अद्यापही पावसाचे पाणी धरणातून वाहत असल्याने धरणाचे नदी पात्रातील काम झालेले नाही. मात्र जानेवारी महिन्यात नदी पात्रातील गेट चे काम तसेच नदी पात्राबाहेरील माती बांधाचे काम एकाच वेळी सुरू होणार आहे. तिकडे आहे त्या उपलब्ध पाणी साठ्यातून सिंचन वाढवण्यासाठी पाच उपसा सिंचन योजनेच्या कामाला देखील गतीने सुरुवात झाली आहे. पाईप टाकण्याला सुरुवात झाली आहे. निम्न तापी प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प असा आहे की धरणाचे काम पूर्ण होण्याआधी उपसा सिंचन योजनांच्या कामांना गती मिळाली आहे.
अमळनेरचे अनिल पाटील यांना मंत्री पद मिळाले नाही म्हणून जनतेत प्रचंड नाराजी पसरली होती. मंत्रिपद नसेल तर निधी मिळेल का ? पाडळसरे धरण कामाला सुरुवात होईल का ? असे अनेक प्रश्न जनतेला सतावत होते. मात्र दुसऱ्याच दिवशी २५० कोटींची तरतूद झाल्याने जनतेला हायसे वाटले आहे.