
२५ वर्षीय इसमाविरुद्ध पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे बु. येथील २५ वर्षीय इसमाने सोबत राहणाऱ्या महिलेच्या नऊ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार महिलेने मारवड पोलीसात केली आहे.

याबाबत ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मूळची राहणार खरगोन (रा. मध्य प्रदेश) असून आपल्या पती व मुलीसह भुसावळ येथे बांधकाम मजूर म्हणून काम करीत होती. मात्र पाच वर्षापूर्वी पतीचे आजारपणात निधन झाले. त्यावेळी सदर महिला गरोदर असल्याने रेल्वेत भिक मागायला सुरुवात केली. व त्यातच तिची ओळख रवींद्र रणछोड पारधी (रा. शिरसाळे बु) याच्यासोबत झाली. सदर महिला स्वमर्जिने त्याच्यासोबत शिरसाळे खु. येथे मुलगी व मुलासह झोपडी बांधून राहू लागले. गेल्या चार पाच महिन्यांपासून रवींद्र याला दारूचे व्यसन जडल्याने तो सदर महिलेला मारझोड करून रेल्वेत भीक मागण्यासाठी पाठवू लागला. १९ रोजी सदर महिला रेल्वेतून भीक मागून घरी आली असता रवींद्र हा तिच्या नऊ वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य करताना आढळून आला. आईला पाहताच ती मुलगी रडू लागली. जिवे मारण्याची धमकी देऊन गेल्या दोन महिन्यात चार पाच वेळा अत्याचार केल्याची माहिती मुलीने त्या महिलेला दिली. रवींद्र हा महिलेला झोपडीबाहेर निघू देत नसल्याने २३ रोजी तो बाहेर गेल्याचे निमित्त साधून सदर महिलेने मारवड पोलीस ठाणे गाठत आपबिती कथन केली. सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पॉक्सो सह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.




