
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गांव करणखेडा येथे दिनांक 19 ते 25 डिसेंबर दरम्यान सुरू असून आज पाचव्या दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांकडून ग्राम प्रबोधनपर अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती अभियान पथनाट्याच्या माध्यमातून सादर केले. शिवाय वृक्ष लागवड करून माझी वसुंधरा अभियान राबविले तसेच एड्सविषयी जनजागृती केली.

गावातील मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी प्रबोधन पर नाटिका सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. या अभियानात ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारच्या बौद्धिक सत्रात प्रकल्प व्यवस्थापक जळगाव, येथील आदित्य सावळे यांनी वनराई बंधाराविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. दुसरे वक्ते प्रा.डॉ.पी.बी.भराटे यांनी मानवी जीवनातील योगाचे महत्व या विषयावर विद्यार्थी व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.किशोर पाटील हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास कुंभार याने केले. अतिथींचा परिचय कु. हर्षदा पाटील हिने करून दिला.शेवटी आभार प्रदर्शन विजय कोळी या विद्यार्थ्यांने केले.




