
चर्चच्या विद्युत रोषणाईने वेधले लक्ष,अनेकांनी भेट देऊन केली प्रार्थना
अमळनेर : -प्रभू येशूच्या जन्मसोहळ्याचा आनंद
घेऊन येणाऱ्या नाताळ सणासाठी अमळनेर येथील ख्रिस्त बांधव सज्ज झाले होते, काल बुधवारी शहरातील बेथेल चर्चमध्ये प्रभू येशू जन्मोत्सव, प्रार्थना व भक्ती उपासनेचे आयोजन केले होते.

मंगळवारी रात्रीच नाताळच्या स्वागताची तयारी पूर्ण करण्यात आली होती,चर्च परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती,येथील ख्रिस्त बांधवांनी घरीही सजावट केली होती. काल सकाळी दहा वाजता चर्चमध्ये ख्रिस्त बांधव व येशू प्रेमींनी एकत्र येऊन देशातील शांततेसाठी प्रार्थना केली.यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम होऊन भेटी देणाऱ्या ना पुस्तक व प्रसाद देण्यात आला.
प्रभू येशूचा जन्मदिवस 25 डिसेंबरला नाताळ सणाने साजरा केला जातो. गेल्या पंधरा दिवसांपासूनच नाताळसाठी सजावटीच्या वस्तू, ख्रिसमस ट्री, केक, पेस्ट्रीज, सांताक्लॉज स्टीकर, टोप्या, स्टार्स, बेल्स यांनी बाजारपेठ सजली होती. दरम्यान, शहरातील चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शहरात ख्रिस्ती बांधवांची संख्या थोडी फार आहे. ख्रिस्त बांधवांच्या घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नाताळ सणाच्या उत्सुकतेने शिखर गाठले होते. नवीन कपडे, सजावट यांची उत्सुकता वाढली होती, नाताळ सण उत्साहात साजरा करण्याची तयारी ख्रिस्त बांधवांनी केली होती. काल दिवसभरात बालक मंडळींनी मोठ्या संख्येने चर्च मध्ये भेट देऊन प्रार्थना केली.




