
अमळनेर :- शहरातील बसस्थानकात बेशिस्त वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. बसस्थानकाच्या आवारात कोठेही दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे बसचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस आत आणताना तसेच बसस्थानकातून बाहेर पडताना कसरत करावी लागते. या ठिकाणी वाहने पार्क करू नयेत, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, वाहनचालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

बसस्थानकातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहने पार्क करू नये, अशा सूचना दिल्या जातात; तसेच या वाहनांसाठी मागील बाजूस पार्किंग व्यवस्था आहे. याठिकाणी वाहने पार्क केली जातात. काही वाहनचालक बसस्थानकाच्या आवारात पार्किंग करतात. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहने व रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे येथे कामयच वाहतूक कोंडी होत असते. या वाहनांच्या गराड्यातून वाट काढताना बसचालकांना कसरत करावी लागते. बसस्थानकातही आता अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. येथे दुचाकी वाहनचालक कोठेही वाहने पार्क करीत आहेत; तसेच दुचाकी वाहनांचीही ये जा सुरू असते. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्किंगवर याआधी बऱ्याचदा कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाही. वाहनचालक येथे पुन्हा वाहने पार्क करीत असल्याचा अनुभव आहे. प्रशासनानेही आता हात टेकले आहेत.
बेशिस्त लागणाऱ्या बसेसमुळे अपघाताचा धोका

अमळनेर आगारात बसेस देखील बेशिस्त पणे लावले जातात.प्रवासी व विद्यार्थी बस पकडण्यासाठी धावपळ करतात.बसस्थानकात इतरत्र लावलेल्या बसेसमुळे येणाऱ्या जाणाऱ्या बस दिसत नसल्याने बसस्थानकात बस खाली येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे खाजगी वाहन चालक तसेच मोटरसायकल चालक व बस चालकांना शिस्त लावण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.




