
अमळनेर:- हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज प्रकल्पांतर्गत अमर ज्योती युवक संघ आणि Reckitt कंपनीच्या पुढाकाराने अमळनेर नगरपालिकेच्या सहकार्याने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत अमळनेर नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छ भारत मिशन आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आरोग्य, स्वच्छता, आणि साफसफाईचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व प्रशिक्षक गणेश पाटील यांनी केले, ज्यांनी कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, आणि स्वच्छतेसाठी आवश्यक शिस्त याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मार्गदर्शक सुनील अहिरराव यांनी आपल्या मार्गदर्शनाने उपस्थितांना प्रेरित केले, तर सामाजिक कार्यकर्ते जब्बार खाटीक यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले. हा पाच दिवसांचा प्रशिक्षण उपक्रम अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात होता, एकूण 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतले गेले, प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याला PPE किट, चहा-नाश्ता, ISO प्रमाणपत्र, आणि प्रशिक्षण विनामूल्य प्रदान करण्यात आले, ज्यामुळे या उपक्रमाला सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
उपस्थितांना संबोधित करताना नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर यांनी स्वच्छतेचे व्यापक सामाजिक परिणाम स्पष्ट केले, तर स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आणि किरण कंडारे यांनी स्वच्छतेच्या तांत्रिक बाजूंची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार ,सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे तसेच प्राध्यापक अशोक पवार सर यांनी मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाला ऍडव्होकेट तिलोत्तमा पाटील आणि प्रभाकर गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, टेक्निशियन लक्ष्मीकांत सोनार यांनी पूर्ण पाच दिवस प्रशिक्षणात टेक्निकलचे काम पाहत उस्फूर्तपणे त्यांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा आत्मसन्मान वाढवला गेला असून, स्वच्छ भारताच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकण्यात आले आहे.




