
मंगळग्रह सेवा संस्थेसह विविध संघटनांचे अनमोल सहकार्य
अमळनेर : दरवर्षाप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळेतर्फे १४ जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी दोन वाजेपासून कुस्त्यांची दंगल होणार आहे. या उपक्रमास मंगळग्रह सेवा संस्थेचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

या दंगलीच्या वेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले,बाजार समिती सभापती अशोक पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पाटील व त्यांचे सहकारी दंगल यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या दंगलीत राज्यातील विविध भागातील कुस्तीपटूंची हजेरी असते. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली असते. दंगलीप्रसंगी अमळनेर शहरातील कुस्तीपटू, तसेच कुस्तीप्रेमींची मोठी उपस्थिती असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे. या दंगलीला शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून मोठ्या देणग्याही उपलब्ध करून दिल्या जात असतात. कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत असतात. हा कार्यक्रम बघण्यासाठी खानदेशातून अनेक कुस्तीप्रेमी हजेरी लावतात. विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येत असतात.




