
चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग करत मारहाण केल्याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणे बु. येथे ३३ वर्षीय घटस्फोटित महिला एकटी राहत असून ४ रोजी सकाळी गावातील मनीष पाटील व सागर बाळू पाटील हे तिच्या घरी आले. व घरकुल साठी सरपंचांना आधार कार्डाचा फोटो लागणार असल्याचे सांगितले. नंतर सागर याने तो आधार कार्डचा फोटो फेसबुकवर टाकल्याचे महिलेला तिच्या मावसभावाने संध्याकाळी सांगितले. १४ रोजी सरपंच किशोर भाऊसाहेब पाटील, बाळा कैलास पाटील, मनीष पाटील व सागर बाळू पाटील व इतर मुले फिर्यादी महिलेच्या घरासमोर उभे होते. त्यावेळी महिलेने फोटो फेसबुकवर का टाकला याचा जाब विचारला असता त्याचा राग येवून सरपंच याने महिलेला कानात मारली व पदर ओढून साडी फाडली. त्यानंतर मनीष याने फिर्यादी महिलेचे केस ओढून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी महिलेचे भाऊ व बहीण तिला सोडवायला आले असता सरपंच व मनीष याने त्यांनाही मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी महिलेने मारवड पोलिसांत फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८(१), ११५, २९६, ३५२, ३५१(२) व अनु. जाती जमाती कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास डीवायएसपी अण्णासाहेब घोलप करीत आहेत.




