
पाच वर्षाची जखमी चिमुरडी झाली पोरकी, मारवड परिसरावर पसरली शोककळा…
अमळनेर:- दहावीच्या गेट टुगेदरसाठी गावी आलेल्या पियूष व वृंदा सोनवणे या पतीपत्नीचा शहापूर फाट्याजवळ झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात मृत्यू झाल्याने मारवड परिसरावर शोककळा पसरली आहे. या अपघातात त्यांची पाच वर्षाची चिमुरडी जखमी झाली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच गावकरी घटनास्थळावर धावले. तात्काळ मदतीचा हात पुढे केला. अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पियुष पाटील (वय ३४)आणि वृंदा पियुष पाटील(वय ३२) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १४ जण जखमी आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.
सुस्वभावी तरुण दाम्पत्याच्या अपघाती निधनाने अनेकांना दुःख अनावर…
पियूष याचे आईवडील व्यवसायानिमित्त सुरत येथे स्थायिक होते. मारवड येथे काकांकडे राहून त्याने शिक्षण घेतले होते. स्पर्धा परीक्षा देत असताना पियूष हा बीएमसीत सुरक्षा रक्षक म्हणून २०१४ साली भरती झाला. त्याची पत्नी वृंदा हीचे माहेर जवळच असलेल्या बोरगाव येथील होते. पियूष याचा मोठ्या संख्येने मित्र परिवार असून दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदर साठी तो चार दिवसांपूर्वी मारवड येथे आला होता. त्यावेळी सर्व मित्रांना नातेवाईकांना तो भेटला. त्याची पत्नी वृंदा ही बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होती. रविवारी मुलीचा वाढदिवस साजरा करून १४ रोजी आपल्या पत्नी व पाच वर्षीय मुलीसह तो बदलापूर येथे कर्तव्यावर येण्यासाठी निघाला. मात्र काळाला वेगळेच मंजूर असल्याने दोघांच्या निधनाची वार्ता पहाटेच गावात धडकली. या अपघातात कृष्णाली ही त्याची चिमुरडी बचावली असून तिचा एक हात मोडला असून किरकोळ दुखापत झाली आहे. काही क्षणातच सुखाचा संसार उध्वस्त झाला असून या सुस्वभावी दांपत्याच्या अपघाती निधनामुळे मारवड, बोरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.
दुपारी शहापूर येथेच दोघांचे शवविच्छेदन करण्यात येऊन रात्री उशिरा मारवड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी अनेकांना शोक अनावर झाला होता. त्यांच्या पाच वर्षीय मुलीला अमळनेर येथे आणून वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.






