
अमळनेर:- आपल्या परंपरेत मकर संक्रांतीनंतर वाण वाटायला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील व गणित शिक्षक डी ए धनगर यांच्या संकल्पनेने व संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने व शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीने, कृतीयुक्त पद्धतीने भूमितीचे प्रमेय शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांना भूमितीच्या अभ्यासाचे वाण वाटण्यात आले.

पारंपारिक पद्धतीने भूमिती शिकवत असताना अनेक प्रमेय शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. किंबहुना अमूर्त पद्धतीने शिकवताना सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे आकलन होते असे नाही. काही विद्यार्थी समजू शकतात परंतु काही विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील , शाळेतील गणिताचे शिक्षकांनी संक्रांतीनंतर भूमितीतील विद्यादानाचे ठरवले. अमूर्त स्वरूपातील गणित मूर्त स्वरूपात बघतांना, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा लाभ झाला. तसेच वर्गात न समजलेल्या संकल्पना सुद्धा सहज प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवल्यामुळे सहज समजले. त्यात प्रामुख्याने रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, संगत कोन व व्युत्क्रम कोन कोन एकरूप असतील तर रेषा समांतर असतात, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, विरुद्ध कोन एकरूप असतात, त्रिकोणाच्या बहिस्थ कोणाच्या माप त्यांच्या दुरस्थ अंतरकोनांच्या बेरजे एवढे असते , हे व इतर प्रमेय कृतीयुक्त पद्धतीने विद्यार्थ्यांनी समजून घेतले. संस्था अध्यक्ष हेमकांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कृतिशील पद्धतीने भूमितीचे प्रमेय अभ्यासल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. जेव्हा गणित दिसायला लागेल तेव्हा विद्यार्थ्यांची गणितातील प्रगती अधिक गतिमान होईल असे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी सांगितले.





