
अमळनेर -डोक्यावर ना छत,ना व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा, त्यामूळे जगण्यासाठी रस्त्यावर संसार मांडलेल्या पांचाळ समाजातील एका 52 वर्षीय इसमाचा रस्त्यावरच झोपेत मृत्यू झाल्याची घटना दिनांक 16 च्या रात्री घडली.

संजय हेमराज सोनवणे – पांचाळ (वय 52) असे मयत इसमाचे नाव असून तो आपल्या आई व दोन मुलांसह जुना बस स्टँड परिसरात वास्तव्यास होता.त्याची पत्नी धुळे येथे असते. संजय व त्याची आई यांचा शेती उपयोगी अवजारे घडविण्याचा व दुरुस्तीचा पिढीजात व्यवसाय आहे.अमळनेर शहरात फायनल प्लॉट 123 मध्ये ते अतिक्रमित जागेत वास्तव्यास असताना पालिकेच्या माध्यमातून तेथील अतिक्रमण काढले गेल्याने हे कुटुंब बेघर झाले होते.मात्र शासनाकडून घरकुलाचा लाभ न मिळाल्याने जुना बस स्टँड परिसरात रस्त्यालगत त्यांनी बस्तान मांडून तेथेच ते दिवसा व्यवसाय करून रात्री तेथेच वास्तव्य करीत होते.सध्या थंडीचा गारठा वाढल्याने अश्यात संजय याचा रात्री झोपेतच मृत्यू झाला.या घटनेने इतर पांचाळ कुटूंबियांनी दुःख व्यक्त केले.मुलाच्या निधनाने आई एकटी पडल्याने इतरांनी आर्थिक मदत दिल्याने त्यातून नातलगांनी अंत्यसंस्कार केले.दरम्यान पांचाळ समाजातील अजूनही काही जण बेघर असून शासनाने त्यांची निवाऱ्याची सोय करावी अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.




