
अमळनेर : वृद्ध मातेचे पालनपोषण न करणाऱ्या मुलांनी आईला दरमहा खावटी द्यावी आणि शेतीतील वारस कमी करून मालमतेवर वृद्धेचे नाव लावण्यात यावे असे एका खटल्यात तर दुसऱ्या खटल्यात विधवा सुनेने दरमहा सासूला खावटी द्यावी आणि बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्यात यावे असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण नितीनकुमार मुंडावरे यांनी दिले आहेत.

सुमनबाई कौतिक महाले (वय ७५ रा शिरसाळ) या महिलेला श्रावण व आबा अशी दोन मुले होती. मुलांनी शिरसाळे येथील गट नंबर ४६/२अ ला श्रावण मयत झाल्याने त्याची पत्नी सुरेखाबाई, मुलगा निलेश आणि मुलगी भाग्यश्री तसेच दुसरा मुलगा आबा त्याच प्रमाणे तीन मुली हे वारस लावले होते. ते वृद्धेचा उदरनिर्वाह करीत नसल्याने तिने जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्याकडे अपील करून खावटी आणि मालमत्तेवरील वारसांची नावे कमी करण्याची मागणी केली होती.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानन्तर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी वृद्धेच्या मयत मुलाच्या कुटुंबीयांनी आणि दुसऱ्या मुलाने उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये खावटी द्यावी तसेच गट नंबर ४६/२अ वरील सर्व वारस कमी करून जमीन फक्त एकटी वृद्धेच्या नावाने करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील कठोरा येथील सुंदरबाई दगडू पाटील हीचा मुलगा नरेंद्र पाटील यांचा ३ मार्च २०२१ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याची पत्नी सीमा हिने मृत्युपत्राच्या आधारे स्वतःचे नाव वारस म्हणून लावले होते आणि मुलींचे हक्क सोड करून घेतले होते. त्या हक्क सोड व वारस विरुद्ध न्यायप्रविष्ट बाब असताना सुनेने गट नम्बर ३२७ मधील काही क्षेत्र बेकायदेशीर विक्री करून वृद्धेच्या उदरनिर्वाहाची काहीच तरतूद ठेवली नव्हती. म्हणून सुंदराबाई हिने सुनेविरुद्ध खावटी आणि खरेदी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नितीनकुमार मुंडावरे यांनी सुनेने सासूला ३ हजार रुपये महिना खावटी द्यावी आणि बेकायदेशीर खरेदीखत रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.





