
चोरट्याला मुद्देमालासह पोलिसांनी केले जेरबंद…
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथे घरातील सर्व जण लग्नाला गेल्याचा फायदा घेत एकाने घरात घुसून दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ जेरबंद केल्याची घटना २ रोजी घडली आहे.

अमळगाव येथील योगेश पृथ्वीराज मोरे याचे लग्न असल्याने सर्व कुटुंबीय येवला जि नाशिक येथे गेले होते. ते लग्नाहून घरी परत आले असता घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. आणि घरातील ४४६०० रुपये रोख, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पँडल असा १,४०,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे आढळून आले. पोलिसांना फोन लावून कळवल्यानंतर आजूबाजूला तपास केला असता करण उर्फ पवन कैलास मोरे हा घराकडे गेल्याची माहिती मिळाली. फिर्यादी, नातेवाईक व पोलिसांनी मिळून पवन याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे योगेश मोरे याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत पवन उर्फ करण कैलास मोरे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.




