
अमळनेर :- धरणगाव तालुक्यातील नांदेड फाटा येथे १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री काही इसमांनी एकाला रस्त्यामध्ये अडवुन त्याच्याकडील मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली म्हणून धरणगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला होता. त्यानुसार गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आदेश देऊन पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहवा नंदलाल पाटील, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, पोना भगवान पाटील, पोकॉ राहुल कोळी व चालक पोहवा दिपक चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले होते.

मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार नमुद गुन्हयातील आरोपी हा तामसवाडी ता. पारोळा येथील असल्याबाबत माहीती मिळाल्याने वर नमुद पथकाने छापा टाकुन त्यास मुददेमालासह ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अक्षय ऊर्फ घोडा भिमराव पाटील (बागुल) रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव असे सांगुन त्याने व त्याचे साथीदार अभिजीत भरतसिंग राजपुत ता. वणी ता.जि.धुळे , अजय भाईदास थोरात रा.नवलनगर ता.जि.धुळे व संभाजी पाटील रा. सातरणे ता.जि.धुळे यांनी मिळून नांदेड फाटा, ता.धरणगाव येथे तोडांला रुमाल बांधुन एका इसमाकडील मोबाईल फोन, रोख रक्कम व मोटारसायकल जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन गेले. तरी नमुद आरोपी नामे अक्षय पाटील याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटारसायकल व रोख रक्कम असे मिळुन एकुण २०५२०/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याला धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.




