
अमळनेर : अवैध वाळू वाहतुकीसाठी तापी नदीवर बांधलेला जळोद अनवर्दे बुधगाव दरम्यान बांधलेला मातीचा बांध चौथ्यांदा महसूल विभागाने तोडला आहे. जणूकाही चोरट्यानी बांधावे आणि महसूल विभागाने तोडावे अशी स्पर्धाच लागली आहे.

तापी नदी पात्रातून चोपडा आणि अमळनेर तालुक्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी नदी पात्रातच बांध बांधण्याची किमया आणि धाडस वाळू चोरट्यानी केले आहे.
वाळू चोरट्यांचे धाडस एव्हढे वाढले आहे की निसर्गाशी छेडछाड सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर इतर ठिकाणची माती खोदून नदी पात्रात नदीचा प्रवाह रोखला जातो. यापूर्वी एकदा दोनदा नव्हे तर तीनदा बांध तोडण्यात आला.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांना सक्त सूचना दिल्या आहेत की यापुढे नदी पात्रात बांध बांधला जाऊ नये म्हणून लक्ष ठेवावे. मात्र मध्यरात्री वाळू वाहतूकदार पुन्हा बांध बांधतात. ५ फेब्रुवारी रोजी अनवर्दे व जळोद दरम्यान बांध बांधण्यात आला होता. ग्राम महसूल अधिकारी भूषण पवार , पोलीस पाटील ,कोतवाल यांनी ६ रोजी तो बांध चौथ्यांदा तोडला आहे.
अनेकदा अधिकारी कर्मचारी वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून जातात आणि चोरट्यांचा नाद सोडून देतात. मात्र उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि त्यांच्या पथकाने देखील चंग बांधला आहे. तुम्ही कितीही वेळा बांधा आम्ही तोडायला सज्ज आहोत असा इशाराच जणू दिला आहे.




