
पीडिता गरोदर राहिल्यावर जबाबदारी झटकून पळाला, एकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- इंस्टाग्राम वर महिलेशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध ठेवून गरोदर महिलेची जबाबदारी झटकून पळणाऱ्या एकाविरुध्द मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर महिलेचे लग्न सन २०१८ मध्ये झाले होते. मात्र पतीशी पटत नसल्याने दोन वर्षाने महिला माहेरी खापरखेडा ता. अमळनेर येथे आपल्या मुलीसह रहायला गेली. सन २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर तिची ओळख एकनाथ छबिलाल पवार (सोनवद ता. धरणगाव) यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने एकनाथ याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेशी खापरखेडा, सोनवद, व पुणे येथे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. एकनाथ याने लग्नाचे वचन दिल्याने सदर महिलेने आपल्या पतीशी फारकत घेतली. त्या संबंधातून सदर महिला गरोदर राहिल्याने तिने एकनाथ याच्याशी लग्नाचा तगादा लावला असता त्याने वेळोवेळी टाळाटाळ केली आहे. तसेच तो सोबत देखील राहत नसून होणाऱ्या बाळाची जबाबदारी घेण्यासही नकार दिल्याने सदर महिलेने मारवड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी एकनाथ छबीलाल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डीवायएसपी अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत.




