
अमळनेर:- येथील गायत्री नगरात पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. संबंधित नागरिकांनी निदर्शनास आणून देखील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

शहरातील ढेकूरोड भागात गायत्री नगरात रीतीने प्रचंड महाकाय वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे जलवाहिनी दबली जाऊन लिक झाली आहे. ही जागा अरुणकुमार निकम यांच्या घरासमोर लीक झाली आहे. यातून ज्या वेळी नळ सुटतात त्यावेळी शेकडो लिटर पाणी बाजूच्या मोकळ्या प्लॉट मध्ये शिरते.
पालिका ठेकेदाराची माणसे येऊन फक्त खड्डा खोदून निघून गेले मात्र तरीही जलवाहिनी दुरुस्त झाली नाही. यामुळे साचलेले पाणी अत्यंत दूषित पाणी परत जलवाहिनीत शिरते. त्यामुळे दूषित पाणीपुरवठा नागरिकांना होतो.
१५ दिवस झाले पण काम नाही – जलवाहिनी फुटून १५ दिवस झाले मात्र तरीही याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एकीकडे पाण्यासाठी वणवण तर दुसरीकडे नासाडी यंदा पाऊस चांगला झाला त्यामुळे हे गंभीर दुर्लक्ष आहे. अनेक तालुक्यांना पाण्याचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी आवर्तन पालिकेला घ्यावे लागले होते. मात्र यंदा कर्मचारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई जाणवली तर त्यात नवल वाटू नये.
खाजगी ठेकेदार काम करत नाही – सदर दुरुस्ती जोडणी हे काम खाजगी ठेकेदार करतो मात्र त्यांची माणसे येतात आणि थोडंफार खोदून निघून जातात. त्याचे बिले दरमहा निघतात ठेकेदार नीट माणसांवर लक्ष ठेवत नाही पर्यायाने नागरिकांची गैरसोय होते.
प्रतिक्रिया – सदर मोकाट पाणी वाहत असल्याने मी स्वतः लक्ष्मीनगर च्या पाण्याच्या टाकीवर पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगून आलो. एक दिवस ठेकेदाराची माणसे आलीत आणि थोडाफार खड्डा करून गेले मात्र अद्यापही प्रश्न सुटला नाही. – विठ्ठल पाटील नागरिक गायत्री नगर
प्रतिक्रिया – आजच माणसे पाठवून लीक शोधला जाईल. गायत्री नगर भागात लीक आहे. तर ठेकेदाराला त्वरित सूचना करण्यात येतील – प्रवीण बैसाने, पाणीपुरवठा अभियंता पालिका




