
अमळनेर : संपूर्ण जग १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करीत असताना अमळनेरात आजी माजी सैनिक , देशभक्त, पोलिस,होमगार्ड यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध म्हणून १४ फेब्रुवारी भारताचा काळा दिवस म्हणून साजरा केला. त्या ४० शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफ चे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील खान्देश रक्षक फौंडेशनचे पदाधिकारी , सदस्य ,आजी माजी सैनिक , सैनिक कुटुंबीय व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने काळा दिवस साजरा करण्यात आला.
महाराणा प्रताप चौकात सर्व शहीद सैनिकांचे नावासह फोटो लावून रांगोळी फुलांच्या पाकळ्या टाकून अमर जवान स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. मेणबत्या लावून सैनिकांच्या वीर पत्नींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी सर्व शहीद जवानांची नावे वाचून माहिती सांगितली. तिरंगा चौकात १५१ फूट तिरंगा लावण्यात आला होता. दोन मिनिटे मौन धारण करून नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




