
ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केले आवाहन…
अमळनेर– कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील.यासाठी नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा-ई-सेवा केंद्रावर सुरू असून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. शहरातील जी. एस. हायस्कूल मध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी जनजागृती कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याबाबत कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
ॲग्रीस्टॅकमुळे पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी आधुनिक यंत्र व अवजारे तसेच इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यात सोयीचे राहील.
आता फार्मर आयडी असेल तर शासनाच्या सर्व योजनांचे लाभ घेता येणार आहेत अन्यथा लाभ मिळणार नाही त्यामुळे नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रावर जाऊन आपला सातबारा आधार लिंक करून फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावेत. यासाठी अमळनेर उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे व तालुका कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांच्या मार्गदर्शनाने शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यात सर्वत्र करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.




