
लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत का ? नागरिकांचा प्रशासन व लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल
अमळनेर : जळगाव जाणाऱ्या रस्त्यावर कुऱ्हे गावाजवळ बनवलेला अंडरपास बोगदा आणि तेथील गतिरोधक नागरिकांसाठी धोकेदायक ठरत असून अनेक मोटरसायकलस्वार अपघाताने पडले आहेत तरी प्रशासन जीव घेण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल प्रवाशी करू लागले आहेत.
अमळनेर येथून जळगाव जाणारे बहुसंख्य प्रवाशी आणि वाहने हे कुऱ्हे मार्गे जातात. मात्र कुऱ्हे येथे बांधण्यात आलेला अंडरपास बोगदा आधीपासून सदोष पद्धतीने बांधण्यात आल्याने अभियंत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. या बोगद्यातून जाण्यासाठी दोन्ही बाजूला ९० अंशाच्या कोनातून वळावे लागत असल्याने वळणावर वाहनांना त्रास होतो. मोठ्या वाहनांना विरुद्ध साईड ने वाहन वळवावे लागते अन्यथा वाहन वळत नाही. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनसोबत अपघाताची शक्यता असतेच.
बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी वेगाने वाहन उतरून अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूला गतिरोधक बांधले आहेत. मात्र ज्या उद्देशासाठी गतिरोधक बांधले त्याच्या उलट प्रकार होत आहे. गतिरोधक इतके उंच आहेत की मोटरसायकलस्वार खाली पडतात. तर लहान चारचाकी यावरून जाताना त्यांच्या चेंबरला जोरात धक्का बसतो अथवा हळुवार पणे गाडी काढताना अडकून पडते आणि मागे जाते त्यावेळी मागाहून येणाऱ्या गाडीला धक्का बसतो. चार चाकी गाडीचे नुकसान होते.
बोगद्यात अजूनही कमी प्रमाणात पाणी लिकेज होऊन साचत आहे. बोगद्यात आधी पडलेले खड्डे भरण्यासाठी ढोबळ पणे काँक्रीट ओतल्याने रस्ता खालीवर झाला आहे. तो भाग देखील वाहनांना त्रासदायक ठरत असून त्याचे अपघात होऊ शकतात. आणि पाणी लिकेज होण्यामुळे परत खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
बोगद्यावर अद्यापही पत्र्याचे शेड बनवण्यात आलेले नसल्याने येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे आणि बाजूच्या शेततलावाचे पाणी साचून पुन्हा वाहतूक खोळंबनार आहे. रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे प्रवाश्याना खूप त्रास सहन करावा लागत आहे.




