
अमळनेर : तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी अधिक भर देण्याचा निर्णय घेतला असून जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी टीव्ही व संगणक संच देण्यात आले.
लहान विद्यार्थ्याना दृक्श्राव्य पद्धतीने शिक्षण दिल्यास ते अधिक ज्ञान आत्मसात करतात. जगाच्या घडामोडी विद्यार्थ्यांना लगेच कळाव्यात त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून ग्रामपंचायतीने डिजिटल शाळा व डिजिटल शिक्षण देण्यासाठी वाघोदा जिप शाळेला दोन एलईडी टी व्ही संच ,संगणक संच , झेरॉक्स मशीन आदी साहित्य मोफत दिले आहे.
सरपंच चेतन पाटील , ग्रामसेवक मुकेश पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्याध्यापक प्रीतम पारखी , उपशिक्षिका दीपाली निकुंभ यांना या वस्तू स्वाधीन केल्या. यावेळी गावातील नागरिक ,ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,पालक उपस्थित होते. शाळेने तसेच पालकांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार मानले आहे.




