
अमळनेर : शहरातील तिरंगा चौक, राष्ट्रीय स्मारक आणि थोर पुरुषांच्या स्मारकाला अतिक्रमणाचा विळखा पडत असल्याने थोर पुरुष आणि राष्ट्रीय संहितेचा अवमान होत असून संबंधित यंत्रणांनी याला आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा चौकात १०५ फुटी तिरंगा डौलाने फडकत असतो. त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहिदाना अभिवादन करणारे स्मारक उभारण्यात आले आहे. या चौकातील तिरंगा आणि ते स्मारक पाहून राष्ट्रभक्ती ची प्रेरणा उफाळून येते. मात्र काही समाजकंटक किरकोळ विक्रेत्यांनी तिरंगा चौकाच्या सभोवताली हातगाड्या , अवैध प्रवासी वाहतूक वाहने , किरकोळ विक्रेते आपली दुकाने थाटतात त्यामुळे राष्ट्रीय संहितेचा अवमान होत आहे.
त्याच प्रमाणे शहरात विविध ठिकाणी विविध धर्मातील जातीतील थोर पुरुष ,संत ,समाजसेवक यांची स्मारके उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी देखील व्यवसायकर्त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे धुळे चोपडा राज्यमार्गावर तिरंगा चौक , पाचपावली मंदिरालगत असलेल्या संत गाडगे महाराज स्मारकाजवळ चपलांचे दुकान , व इतर विक्रेते उभे असतात. बसस्थानकाजवळ अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक असून तेथे देखील भाजीपाला विक्रेता , किरकोळ विक्रेता , टॅक्सी आदींचे अतिक्रमण झालेले दिसून येते. तर महाराणा प्रताप चौकात देखील फळविक्रेते ,थंड पेय दुकाने व इतर विक्रेते यांचे अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे थोर पुरुषांची थोरवी झाकून टाकली आहे. स्मारके पाहून त्यांच्या कार्यांना उजाळा मिळून भावी पिढीला प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र अशा समाजकंटकांमुळे सामान्य जनतेचा अपेक्षाभंग होत आहे.
या विक्रेत्यांमुळे ग्राहक भर रस्त्यात खरेदीसाठी वाहने उभी करतात. परिणामी वाहतूक कोंडी होते. वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन किरकोळ अपघात देखील होतात. नगरपालिका अतिक्रमण विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त आणि कठोर कारवाईची गरज आहे. संपूर्ण धुळे रस्त्यावर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असल्याने कायमस्वरूपी नियंत्रण मिळवून प्रशासन सहजपणे राष्ट्रीय स्मारक आणि थोर पुरुषांचे स्मारके मोकळा श्वास घेतील.
राष्ट्रीय अस्मिता जपण्यासाठी आणि थोर पुरुषांची थोरवी टिकून राहण्यासाठी तथाकथित समाजसेवक, लोकप्रतिनिधी ,प्रशासन , त्या त्या समाजाचे कार्यकर्ते यांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.




