
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मारवड यांच्यातर्फे शिवजयंती निमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन, प्रतिमा पूजन व आरती मारवड पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. जिभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात शिवजयंती उत्सव समिती यांच्या मार्फत प्रथम तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली. तसेच कमलकिशोर पाटील यांच्यातर्फे स्वर्गीय माजी सरपंच वसंतराव चुडामन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रथम पाच विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो फ्रेम देण्यात आली. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक रूश्वी अरुणकुमार साळुंखे (इयत्ता चौथी), द्वितीय क्रमांक दिव्यांनी समाधान शिंदे (इयत्ता तिसरी) आणि तृतीय क्रमांक फाल्गुनी नामदेव पाटील (इयत्ता दुसरी) यांनी पटकावला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम स्वरा शेखर पाटील, नूतन चेतन चव्हाण, तनिष्का जगदीश पाटील ,गायत्री दिनेश बडगुजर आणि प्रज्ञा दिग्विजय साळुंखे यांना देण्यात आली. शाळेच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मारवड यांचे आभार व ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.




