
अमळनेर : लग्न सोहळा म्हणजे विवाहित जोडप्याला संसाराची नवीन जबाबदारी देण्याचा सोहळा, नातेवाईक , मित्र परिवार आशीर्वाद देऊन जबाबदारी सोपवून जातात अमळनेर येथील एका लग्न सोहळ्यात मात्र प्रवेश द्वारावर सिड बॉल हातात दिल्याने हरित क्रांतीची जबाबदारी हातात पडलेली पाहून सारेच जण भारावले होते.
लग्न सोहळा म्हटला की प्रवेशद्वारावर स्वागतासाठी सज्ज असलेली यजमान मंडळी, हातात गुलाबाची फुले, मुखवास , सजवलेल्या अक्षदांच्या लहान पुड्या घेतलेल्या मुली अथवा मुले, तसेच आहेर स्वीकारण्यासाठी असलेले टेबल, आहेर वाटणाऱ्या करवल्या असे दृश्य सर्वत्र दिसते. मात्र २० रोजी अमळनेर येथील हरीश विजय देशमुख याचा विवाह राजश्री शरद देसले हिच्याशी झाला. ना आहेर स्वीकारायला कोणी होते ना आहेर वाटायला कोणी दिसले… आलेल्या प्रत्येक वऱ्हाडीच्या, पाहुणे मंडळीच्या हातात प्लास्टिकच्या लहान पुडीत शेणामातीचा लहान गोळा दिला जात होता. उत्सुकतेने प्रत्येक जण हा काय प्रकार ? हे काय आहे म्हणून विचारत होते. स्वागत करणारे त्यांना शांतपणे उत्तर देत होते हे एक झाड आहे तुम्हाला जगवायचे आहे. या गोळ्यात एक झाडाची बी आहे त्याला खत आणि मातीचे आवरण लावले आहे. तुम्हाला ते घरी अथवा शेतात लावायचे आहे आणि नाहीच जमले तर कुठे तरी जंगलात हा गोळा फेकून द्या पावसाळ्यात पाण्याने भिजून ते त्यातून अंकुर फुटून झाड आपोआप जगेल. नवरदेव हरीष याच्या हरित क्रांतीच्या प्रयत्नांने सारेच पाहुणे भारावले होते. स्वतःची उत्क्रांती करताना त्याने हरित क्रांतीचा प्रयत्न केला. आधीपासून सामाजिक कार्य करणाऱ्या युवा भारत संघटनेत सक्रिय काम करणाऱ्या हरीश देशमुख याला समाजसेवा शांत बसू देत नव्हती. आपल्या लग्नाला येणारे शेकडो पाहुण्यांच्या हातून पर्यावरण समृद्धी करण्यासाठी त्याने सिड बॉल ची संकल्पना राबवायचे ठरवले. खास करून तामिळनाडू येथील एका संस्थेकडून अडीच हजार सिड बॉल आणून त्याचे श्रेय स्वतः न घेता युवा भारत संघटनेला दिले. त्या पुडीवर युवा भारत संघटनेचे नाव छापून मागे फक्त बारीक अक्षरात हरीश व राजश्री देशमुख फॅमिली एव्हढेच लिहिले.विजेंद्र शिरसाळे , विवेक बिऱ्हाडे ,राहुल चौधरी , डॉ जय देशमुख ,विजय देशमुख , निलेश देशमुख , केतू ठाकूर , मयूर पाटील ,प्रतिक देशमुख ,जयेश भागवत ,शुभम देशमुख या मित्रांनी वऱ्हाडीना सिड बॉल वाटप करण्यात मदत केली.
माझ्या लग्नाला आलेल्या प्रत्येक वऱ्हाडीला मी सिड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण समृद्धीची जबाबदारी दिली. हजारो सिड बॉल मधून शेकडो झाडे जगली तरी ते सार्थ ठरणार आहे. प्रत्येक युवकाने अशा एखाद्या कार्यक्रमातून कमी खर्चात नवनवीन संकल्पना राबविल्यास देश समृद्ध होईल- हरीश विजय देशमुख ,अमळनेर.




