
अमळनेर – आयकर विभाग, सर्कल-१, जळगाव यांच्या वतीने आयकर कायदे आणि अनुपालन याबाबत जनजागृती करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम अमळनेर येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक कुमार, उपायुक्त आयकर (DCIT), सर्कल-१, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आयकर कायद्याचे महत्त्व आणि रोख व्यवहारांचे नियमन करण्याचे फायदे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विशाल माकवाने, अतिरिक्त आयुक्त, आयकर (Addl.CIT) यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात त्यांनी आयकर कायद्यांचे सखोल स्पष्टीकरण देत कर भरण्याचे फायदे आणि आर्थिक प्रगतीतील त्याचे महत्त्व स्पष्ट केले.
सीए अजय हिंदुजा यांनी सीए संघटनेचे प्रतिनिधित्व करत कर प्रणाली आणि आर्थिक विकास यांच्यातील संबंध यावर आपली मते मांडली. व्यावसायिक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आशिष गोकलानी यांनी व्यवसाय कर कायदे आणि त्यासंबंधित अडचणी यावर प्रकाश टाकला.
सरजु गोकलानी, विनोदभैय्या पाटील, ओमप्रकाश मुंदडे, रामदास निकुंभ आणि रमेश जीवनानी यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन सीए नीरज अग्रवाल यांनी तर आयकर आधिकारी राकेश रंजन यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयकर निरीक्षक हिरालाल पाटील आणि अतिफ बेग यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सीए गोपाळ पिंपळकर, सीए रुपेश मकवाना, सीए नितीश कटारिया आणि सीए आकाश वर्मा यांनी प्रयत्न केले.




