
अमळनेर : शहरात पुन्हा मुंदडा नगर गेट जवळ ८० फुटी रस्त्याचे खोदकाम करताना पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी रस्ते , भुयारी गटारींचे कामे सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईप लाईन फुटणे आणि नागरिकांची नळ जोडणी तुटणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतेच मरीमाता मंदिराजवळील एअर व्हॉल्व्ह तुटल्याने पाणी पुरवठा लांबला तो दुरुस्त होत नाही तोच त्याच भागात भुयारी गटार खोदकाम करणाऱ्यांनी पाईप लाईन तोडल्याने काही ठिकाणी ११ दिवस तर काही ठिकाणी १३ दिवस पाणी पुरवठा बंद होता.
२३ रोजी पुन्हा मुंदडा नगर प्रवेशद्वाराजवळ ८० फुटी रस्त्याचे काम सुरू असताना पाईप लाईन फुटल्याने कारंजा उडू लागले होते. लाखो लिटर पाणी वाया जाऊन रस्त्यावर चिखल झाला आहे. नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले आहे.
अवघ्या दीड फुटावर पिण्याची पाइपलाइन कशी?
मुंदडा नगर भागात ८० फुटी रस्ता अवघा दीड फूट खोदला जात आहे. असे असतानाही या भागातील पिण्याची पाईप लाईन फुटली म्हणजे पाईप लाईन फक्त दीड फुटावर टाकली हे सिद्ध होते. पाईप लाईन दीड फुटावर कशी टाकली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तत्कालीन अभियंते आणि ठेकेदार यांनी पाईपलाईनचे काम निकृष्ट केल्याचे स्पष्ट होते.
भुयारी गटार आणि रस्त्याचे ठेकेदार खोदकाम करतांना पालिकेच्या अभियंत्यांना विश्वासात न घेता, पाईप लाईन अथवा इतर केबलची माहिती नागरिकांकडून न घेता वेगाने खोदकाम करत असल्याने नागरिकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आणि वारंवार पाणीपुरवठा खंडित झाल्याने विनाकारण मुख्याधिकारी, अभियंता आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.




