
अमळनेर : शहरातील काही रस्त्यांवर विद्युत पोल , तारा मध्यभागी असल्याने अडथळा निर्माण होऊन अपघातांना आमंत्रण ठरत आहेत. काही ठिकाणी घरे नसताना देखील रस्ते बांधण्यात आले आहेत.
पिंपळे रस्त्यावर एका नाल्यावर पूल आणि जोड रस्ता असा बांधला आहे की आधीचा रस्ता आणि नंतर रस्ता दोन ते तीन फूट आजूबाजूला सरकले आहेत. तसेच रस्त्याचे काँक्रीटीकरण सूरु झाले तरी भर रस्त्यात असलेला विजेचा खांब काढण्यात आला नाही आणि लगेच पुढे असलेला खांबाला आधार दिलेला तार देखील रस्त्यात असल्याने याठिकाणी वाहतूक सुरळीत कशी होईल. विशेष म्हणजे याठिकाणी एकही घर नसतांना रस्ता कोणासाठी बांधला असा प्रश्न अमळनेरच्या जनतेला पडला आहे. काही जाणकारांच्या मते शेत मालकाचे प्लॉट बांधण्यात यावेत म्हणून रस्ता आणि पूल बांधण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
त्याच प्रमाणे धुळे रोड लगत बोरसे कॉलनीत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आले तरीही रस्त्यातील तार हटवण्यात आला नाही. वळणावर तार असल्याने लहान मुले ,सायकलस्वार ,मोटरसायकलस्वार त्यात अडकून किरकोळ अपघात होतात. मात्र पालिका अथवा वीज मंडळाने तार हटवण्याची तसदी घेतलेली नाही.
बसस्थानक समोर भागवत रस्ता काँक्रीटीकरण , डांबरीकरण करण्यात आला मात्र रस्ता पालिकेनेचे लोखंडी बार लावून बंद करून ठेवला असल्याने रस्ता कोणासाठी करण्यात आला असा सवाल जनता करीत आहे. या रस्त्यावर अतिक्रमित दुकाने असल्याने त्यांच्यासाठी पालिकेने सोय केली का अशीही टीका होत आहे. याबाबत पालिका, लोकशाही दिन, जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी करूनही साधी दखल घेतलेली नाही. तरी पालिकेने रस्त्यातील अडथळे दूर करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.




