
कंपनीने तडकाफडकी बडतर्फ केल्याने आत्महत्या केल्याचा सहकाऱ्यांनी केला आरोप…
अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना २५ रोजी सायंकाळी घडली आहे.
तालुक्यातील मुंगसे येथील २६ वर्षीय तरुण मनोज रवींद्र पाटील याने २५ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याचे उघडकीस आले. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संदेश पाटील हे करीत आहेत.
कंपनीने तडकाफडकी बडतर्फ केल्याने आत्महत्या केल्याचा आरोप…
मयत मनोज हा भरूच येथील खाजगी कंपनीत कामाला होता. त्याच्या आत्महत्येनंतर २६ रोजी त्याचे भरूच येथील सहकारी व मित्र यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठत त्याच्या मृत्यूप्रकरणी कंपनीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला. महिन्याभरापूर्वी त्याला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आल्याने तो गावी आला होता. बडतर्फ केल्यामुळे व दुसरी नोकरी मिळत नसल्याने त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.




