
अमळनेर- तालुक्यातील निम येथील श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर येथे आज महाशिवरात्री निमित्ताने खान्देशासह राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावीत दर्शन घेतले. आज दिवसभरात मोठ्याप्रमाणात रांगा लागल्या असून लाखो भाविक श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरावर दाखल झाले होते. परप्रांतीय भाविकांनी मुक्कामीच आले असल्याने मंदिराचे ट्रस्टी यांनी सेवा दिली.
सकाळी ट्रस्ट तर्फे मगन पाटील यांनी अभिषेक केला. सकाळी ९ वाजता श्री.खंडा महाजन यांनी ध्वज लावला. जळगाव, धुळे, नंदुरबार, गुजरात येथील भाविक आले होते.शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील लोक प्रतिनिधी यांनी व लाखो भाविकांनी दर्शन घेतले . खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी यांनीही कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
अमळनेर येथून जादा एस टी बस सेवा पूरविण्यात आल्या आहेत.कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक राजेश राठोड, मुनाफ तडवी यांच्यासह स्काऊट विद्यार्थ्यांनी सेवा देत परिसरात स्वच्छताही केली. सकाळी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्याने मंदिराच्या एक किलोमीटर अंतरापर्यन्त सर्वत्र गर्दी दिसत होती.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिराचा जागेचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याने राज्य शासनाचा निधी बाबत उदासीनता दिसून येते परिणामी येथील मंदिराचा विकास आजही लोकवर्गणीतून होत आहे. शासनाचा निधी मिळाल्यास मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. त्याचप्रमाणे नीम -मांजरोद पुलाचा प्रश्न सोडविणे साठी ट्रस्टचे सचिव मगन पाटील, तुकाराम पाटील डॉ. एल. डी. चौधरी आदींनी मागणी केली . खासदार स्मिता वाघ यांनीही यावेळी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी मंदिराचे मठाधीपती हंसानंद महाराज यांच्या उपस्थितीत महामंडलेश्वर देवेश्वर तीर्थ महाराज यांनी स्मिता वाघ यांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले. दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्त ठेवला होता.




