
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील ६५ वर्षीय इसमाने शालकाच्या व शेजाऱ्याच्या मानसिक जाचाला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना २८ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील लक्ष्मण तुकाराम कोळी (वय ६५) यांनी गावात राहणारा त्यांचा शालक कैलास झेंडू कोळी याच्याकडून जागा खरेदी केली होती. गेल्या महिन्याभरापासून त्याठिकाणी घर बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. बांधकाम सुरू केल्यापासून मयत लक्षण कोळी यांना शालक कैलास कोळी व शेजारी राहणारा ज्ञानेश्वर एकनाथ कोळी हे खड्डा खोदणे व माती टाकण्यावरून शिवीगाळ करत वाद घालून त्रास देत होते. २८ रोजी पुन्हा या दोघांनी भांडण करुन शिवीगाळ केल्याने त्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून लक्ष्मण तुकाराम कोळी यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या पत्नीने मारवड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोउनि विनोद पाटील हे करीत आहेत.




