
प्र. डांगरी येथे दिपाली उदय शिसोदे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड….
अमळनेर:- तालुक्यातील डांगरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कु. दिपाली उदय शिसोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तिचा भाऊ विकासो चेअरमन पदाची धुरा सांभाळत असून गावचा कारभार सांभाळणारी उच्चशिक्षित बहीण भावाची जोडी अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.
नूतन सरपंचा दिपाली (वय २६ वर्ष) हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण घेतले आहे व तिचा २४ वर्षीय भाऊ चि. स्वप्नील उदय शिसोदे हा देखील विकास सोसायटी प्र. डांगरी येथे चेअरमन आहे. तो देखील फार्मसीचे शिक्षण घेत आहे. दोघे उच्चशिक्षित भाऊ बहिण गावाचा मुख्य धुरा सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील उदय प्रल्हाद शिसोदे हे ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत. त्याच ठिकाणी मुलीला सरपंच पदाचा बहुमान मिळाल्याने आईवडिलांचा व कुटुंबीयांचा आनंदाने ऊर भरून आला होता. या निवडीप्रसंगी मंडळ अधिकारी पी. पी. शिंदे, तलाठी श्रीमती बडगुजर, ग्रामसेवक विवेक सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य अनिल शिसोदे, योगेश नारायण शिसोदे, कैलास सोनू कोळी, मीना रामचंद्र पाटील, ललिता महेंद्र शिसोदे, जकियाबी पठाण आदी उपस्थित होते. त्यानंतर ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून नवनिर्वाचित सरपंच दीपाली हिचा सत्कार करण्यात आला.




