
अतिक्रमित ५० रहिवाशी व व्यापाऱ्यांना दिल्या नोटीसा
अमळनेर : शहरातील बसस्थानक शेजारील गांधीनगर मधील अतिक्रमित ५० रहिवाशी व व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा दिल्या असून १० रोजी सोमवारी अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
बसस्थानक शेजारील गांधीनगर येथे रस्त्यावर अनेकांनी घरे बांधून रहिवास केला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याच प्रमाणे काही दुकानदारांनी देखील अतिक्रमण केले असून बाजूलाच प्रशासकीय व महसूल इमारत बांधली जात आहे.
विशेष म्हणजे गांधीनगर अतिक्रमण काढण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले येथील सर्व रहिवाश्यांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडाची घरे देण्यात आली आहेत. तरी देखील या लोकांनी अतिक्रमित घराचा ताबा कायम ठेवला आहे. काहींनी घरे सट्टा व्यवसायिकांना भाड्याने दिली असून त्यावर कमाई करीत आहेत तर काहींनी इतर दुकानदाराना दिले आहेत. रहिवासी वस्तीतच सट्टा व्यवसाय सुरू असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कठोर निर्णय घेत ५० अतिक्रमण धारकांना नोटिसा दिल्या आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे. सोमवारी पोलीस बंदोबस्त देण्यात आल्याने १० रोजी अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे. येथील अतिक्रमित घरे आणि दुकाने हटविण्यात आल्यास रस्त्याचे काँक्रीटीकरण कामास लगेच सुरुवात होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे.




