
अमळनेर तालुक्यात सीसीआय केंद्रच नसल्याने शेतकरी नोंदणी कुठे करणार ??
अमळनेर : किमान हमी भावाने सीसीआय कडे कापूस विक्रीला पात्र ठरण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ मार्चपूर्वी सीसीआय केंद्राकडे नोंदणी आवश्यक असल्याचे पत्रक पणन सहसंचालक स्नेहा जोशी यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ च्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी पात्र ठरायचे असेल आणि एम एस पी चा लाभ मिळण्यासाठी त्यांनी सीसीआय केंद्रांकडे आपली नोंद करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना आपला कापूस सीसीआय कडे विकता येणार नाही.
कापूस महामंडळ आणि पणन संचालनालयाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी सीसीआय केंद्राकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु अमळनेर सारख्या तालुक्यात सीसीआय चे केंद्रच सुरू झालेले नाही. तर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी कोठे करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना जर सीसीआय साठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना बाहेरच्या धरणगाव , पारोळा तालुक्यात जावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा जाईल त्यामुळे शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहतील. ६ मार्च रोजी पत्रक प्रसिद्धीला दिल्याने नोंदणीसाठी फक्त आठ दिवसांची मुदत मिळणार आहे. त्यामुळे गर्दी वाढून साईट जाम होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील सीसीआय केंद्रांवर खरेदी बंद करण्यात आली आणि दुसरीकडे सीसीआय केंद्राकडे नोंदणीचे आवाहन केले जात असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढला आहे.




