
हिंदू मुस्लिम सणांच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त…
अमळनेर : एका व्यक्तीचे स्टेटस ठेवण्यावरून किरकोळ वाद झाल्याने लोकांकडून गर्दीत गैरसमजाने अनर्थ होऊ नये म्हणून आपली दुकाने बंद केल्याने अफवा पसरली होती.
आगामी ईद आणि गुढीपाडवा या हिंदू मुस्लिम सणांच्या दृष्टीने बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला होता. पारोळा ,धरणगाव ,मारवड येथून पोलीस मागवून विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला.

अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , डीवायएसपी विनायक कोते , परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शहरात विविध ठिकाणी पाहणी केली. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी देखील घटनेबाबत सत्यता आणि गांभीर्य याचा आढावा घेतला. नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
दरम्यान घटनेबाबत पत्रकाराना वारंवार विचारणा होत होती. किरकोळ बाबीचा बेबनाव केला जात होता. मात्र अमळनेर पोलीस स्टेशनला हाणामारी किंवा मारहाण किंवा कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. म्हणून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने देखील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांमुळे गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे अशा व्यक्तींवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा डीवायएसपी विनायक कोते , परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी दिला आहे.




