
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर राहिल्याने एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोप प्रकरणी दोन्ही डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत.

पातोंडा येथील प्रवीण एकनाथ बिरारी वय २६ या तरुणाने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्यासाठी पातोंडा प्राथमिक केंद्रात धाव घेतली. मात्र सायंकाळी ६ वाजता तेथे शिपाई व्यतिरिक्त एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. नवीन प्राथमिक केंद्र व दोन डॉक्टरांसह कर्मचारी नियुक्त असताना तेथे कोणीच हजर नव्हते यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. अखेरीस त्यांनी रुग्णवाहिकेतून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी निघाले असता रस्त्यात त्याचा जीव गेला. डॉक्टर व कर्मचारी हजर असते तर कदाचित तरुणाचा जीव वाचला असता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांच्या ओरड ची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी १९ रोजी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विशाल राजेंद्र पवार व डॉ मयुरेश रतन माने याना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
नोटीसीत म्हटले आहे की रुग्णाला वेळीच उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता. याला आपण व्यक्तिशः जबाबदार आहेत. आपणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. ही बाब अत्यन्त गंभीर असून कर्तव्यात अक्षम्य कसूर करणारी आहे. तसेच समाज मनामध्ये कार्यालयाची प्रतिमा मलिन करणारी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आपण थांबून आपद्ग्रस्तना उपचार करीत नसल्याचे आढळून आले आहे. आपणास सोपवलेल्या कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता करीत असल्याचे दिसून येते. वारंवार लेखी ,तोंडी सूचना व कारणे दाखवा नोटिसा देऊन देखील सुधारणा झालेली नाही. एकंदरीत आपण आपले काम शासनाच्या आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व वरिष्ठांनी आखून दिलेल्या सोपवलेल्या कार्यानुसार न करता मनमानी पद्धतीने करतात म्हणून आपले वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) अधिनियमम १९७९ नुसार शास्ती विषयक पात्र ठरणारे आहे. याबाबत नोटीस मिळाल्यापासून दोन दिवसांच्या आत खुलासा करावा तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तीन दिवसात खुलासा करावा असेही नोटीसीत म्हटले आहे. अन्यथा आपल्या बिरुद्ध शास्त विषयक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.




