
जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत बोलतांना मुख्य अभियंता ज द बोरकर यांची माहिती…
अमळनेर:- निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणात येत्या दोन वर्षात पाणी अडवले जाईल या उद्दिष्टाने नियोजनपूर्वक बांधकाम सुरू असल्याचे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत बोलतांना मुख्य अभियंता ज द बोरकर यांनी जळगांव येथे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे दालनात झालेल्या बैठकीतील चर्चेत सांगितले.

तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प गतिमानतेने पूर्ण व्हावा याकरिता पाडळसरे धरण जन आंदोलन समिती सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे या पार्श्वभूमीवर जळगाव येथील जळगांव येथे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज द बोरकर यांचे कार्यालयात भेट घेतली असता याप्रसंगी झालेल्या चर्चेत समितीतर्फे पाडळसरे धरणाच्या कामाच्या प्रगतीबाबत तसेच निधीबाबत विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत अभियंता बोरकर यांनी सांगितले की टाय प्लेट धरण स्थळी पोहचलेले असून गेट साठी आवश्यक असे गरडर बसविण्यासाठीच्या पार्टचे काम धरणाच्या वर्कशॉप वर सुरू आहे. यंदाच्या वर्षी प्राप्त निधी जून पर्यंत खर्च करण्याचे नियोजन असून पुढील वर्षी निधी उपलब्ध झाल्यास निश्चितपणे येत्या दोन वर्षात धरणाचे महाकाय गेट उभे राहतील व सदर धरणात पाणी दिसेल इतके काम होईल.धरणाच्या बांधकामांसोबत उपसा सिंचन योजना व पाईपलाईनचे तसेच सदर उपसा सिंचन योजनांच्या पंपिंग स्टेशनचे काम देखील समांतर सुरू असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेत सांगण्यात आले.
यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,हेमंत भांडारकर,अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे, सुनिल पाटील यांनी धरणासाठी शासनाचा प्राप्त निधी पूर्णपने धरणावरच खर्च करावा.अवर्षणग्रस्त पट्ट्यात असलेल्या या धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश तातडीने व्हावा यासाठी प्रशासनिक पातळीवर कोणतीही तांत्रिक अडचण राहू नये असा आग्रह धरला तर पाडळसरे धरणासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असेल म्हणून सदर धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत व्हावा यासाठी समिती राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा करीत आहे प्रसंगी यासाठी समिती मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही यावेळी समितीतर्फे सांगण्यात आले.याप्रसंगी मुख्य अभियंता ज द बोरकर हे मागील ३ वर्षांपेक्षा अधिक काळापासून सदर प्रकल्पावर तांत्रिक पातळीवर उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांचा सत्कार समितीतर्फे करण्यात आला.




